¡Sorpréndeme!

जळगाव रेल्वे स्थानक परिसरात संशयास्पद कारमुळं खळबळ; बॉम्ब स्कॉडने दार उघडला अन्...

2025-05-12 2 Dailymotion

जळगाव : सध्या भारत-पाक तणावामुळे देशभरातील नागरिक सावध आहेत. अशातच शहरातील रेल्वे स्थानक परिसरात सोमवारी (१२ मे) सकाळी एक संशयास्पद कार उभी असल्याची माहिती मिळाल्यानंतर खळबळ उडाली. या कारमधून सतत टिक टिक असा घड्याळाच्या काट्याप्रमाणे आवाज येत असल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. घटनेची माहिती मिळताच जळगाव जिल्हा पोलीस दल तसेच बॉम्बशोधक पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं. सुरक्षेच्या दृष्टीने परिसर रिकामा करून तपासणी सुरू करण्यात आली. दरम्यान, प्राथमिक तपासात ही कार गेल्या दोन ते तीन दिवसांपासून रेल्वे स्थानक परिसरात उभी असल्याचं निष्पन्न झालं. कारची बॅटरी डाऊन झाल्याने इंडिकेटर सुरूच राहिल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळंच सतत आवाज येत होता. बॉम्ब शोधक पथकानं कारची काच फोडून इंडिकेटर बंद केलं.  त्यानंतर आवाज थांबला. तपासात कारमध्ये कोणताही स्फोटक पदार्थ सापडलेला नाही. त्यामुळं बॉम्ब असल्याची शक्यता फोल ठरली आहे. सदर कार ही एका महिलेच्या नावावर असल्याचं समोर आलं असून, कारच्या समोरील काचेसमोर “पोलीस” अशी पाटी लावलेली होती. पोलिसांनी पंचनामा करून ही कार पुढील चौकशीसाठी ताब्यात घेतली आहे. या प्रकरणामुळं काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.