पुणे : पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे भारतीय सैन्य दलानं पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. 'मिशन सिंदूर' अंतर्गत केलेल्या कारवाईमध्ये भारतानं विविध दहशतवादी संघटनांचे नऊ तळ नष्ट केले. यानंतर चवताळलेल्या पाकिस्ताननं भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतीय सैन्यानं ते प्रयत्न हाणून पाडले. यामुळं भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन देशभरातील अतिमहत्त्वाची ठिकाणं आणि धार्मिक स्थळाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराबाहेरदेखील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दर्शाला येणाऱ्या प्रत्येक भाविकांची बॅग तपासली जात आहे. तसंच मंदिर प्रशासनाकडूनदेखील येणाऱ्या भाविकांची तपासणी करून दर्शनासाठी मंदिरात सोडण्यात येत आहे.