पुणे : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी सोनं मोठ्या प्रमाणावर खरेदी केलं जातं. आज देखील पुण्यातील बाजारपेठेत नागरिकांनी गर्दी करत सोने खरेदी केलं आहे. अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर सोने खरेदीची परंपरा असून या दिवशी सोने खरेदी शुभ मानलं जातं आणि त्यानुसार आज नागरिकांकडून सोने खरेदी केली जात आहे. पुण्यातील लक्ष्मी रोडवर असलेल्या सराफ दुकानांमध्ये नागरिक सोने खरेदी करताना पाहायला मिळत आहेत. लक्ष्मी रोडवर असलेल्या रांका ज्वेलर्स येथे देखील सकाळपासून सोने खरेदी करताना नागरिक पाहायला मिळत आहेत. याबाबत रांका ज्वेलर्सचे डायरेक्टर शैलेश रांका म्हणाले की, आज सोन्याचे भाव जरी ९५ हजारवर गेले असले तरी लोकांची जी आजच्या दिवसाप्रती श्रद्धा आहे ती कमी होताना पाहायला मिळत नाहीये. लोक आजच्या दिवशी एक तोळे तरी सोने खरेदी करत आहेत. शहरातील आमच्या तिन्ही दुकानांमध्ये लोक हे सोने खरेदी करत आहेत.आम्ही आमच्या डिझाईनमध्ये बदल करत गेलो आहे आणि आता लाईट वेट डिझाईनच्या ज्वेलरीला नागरिकांची जास्त मागणी असल्याचं यावेळी शैलेश रांका म्हणाले.