जालना : शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांचा मुलगा अभिमन्यू खोतकर यांना जीवे मारण्याची धमकी सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाली होती. इन्स्टाग्रामच्या चार वेगवेगळ्या अकाऊंटवरून ही धमकी देण्यात आली होती. या धमकीनंतर अर्जुन खोतकर यांचे चिरंजीव अभिमन्यू खोतकर यांनी तालुका पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केलाय. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याचा मोबाईल जप्त केला आहे. यानंतर पोलिसांनी त्या मुलाला समज देऊन आणि पालकांना नोटीस देऊन त्याची सुटका केली. पोलीस या प्रकरणी इतर आरोपींचा शोध घेत आहेत. "शहरातील आयपीएल सट्टा, मटका आणि गैरव्यवहार बंद केल्यामुळं मला जीवे मारण्याची धमकी आली. मला धमक्या देणाऱ्यांचा व्यवस्थित बंदोबस्त करू. या धमक्यांना घाबरून मी माझं काम थांबवणार नाही," अशी प्रतिक्रिया आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली.