Indus Water Treaty : सिंधू नदी पाणी करार स्थगित! पाकिस्तानवर काय परिणाम होणार?
सिंधू नदी पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय पाकिस्तानवर लगेच परिणाम करणारा ठरणार नाही. मात्र, सप्टेंबर-ऑक्टोबरनंतर त्याचे विपरीत परिणाम पाकिस्तानी शेतकरी आणि सामान्य जनतेवर होईल, असे मत संरक्षण तज्ञ कर्नल अभय पटवर्धन यांनी व्यक्त केले आहे.
अभय पटवर्धन म्हणाले की, पाकिस्तानवर सिंधू नदी करार रद्द करून तातडीने परिणाम आणण्यासाठी आवश्यक मोठे धरण आपल्याकडे नाही. सिंधू नदीवर एकच मोठा धरण आहे. मात्र, त्यामध्ये भारत एका क्षमतेपर्यंतच पाणी थांबवू शकतो. तसंही पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातला गहू आणि मक्याचा यंदाचा पीक आता कापणीवर आला आहे. त्याला पाण्याची फारशी गरज नाही. येणाऱ्या हंगामात होणाऱ्या पेरणीला मात्र सप्टेंबर पासून पाण्याची गरज भासेल आणि तेव्हा भारताने अडवलेलं पाणी पाकिस्तानाला अडचणीचं ठरेल.
भारताने योजलेले विजा रद्द करण्याचे किंवा वाघा बॉर्डर आणि हुसेनिवाला बॉर्डरवरील ये-जा थांबवण्याचे निर्णय पाकिस्तानवर तातडीने फारसा परिणाम करणारे ठरणार नाही. फक्त विजा रद्द केल्यामुळे पाकिस्तानी नागरिकांसोबत छुप्या स्वरूपात जे दहशतवादी किंवा त्यांच्या स्लीपर सेलचे व्यक्ती भारतात प्रवेश करायचे, ती गोष्ट विजा रद्द केल्याने नियंत्रणात येईल, असे त्यांनी म्हटले आहे.