काश्मीरच्या पहलगाम परिसरात दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश आहे. त्यापैकी पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे (kaustubh ganbote) यांचे मृतदेह गुरुवारी सकाळी पुण्यात आणण्यात आले. पहाटेच्या सुमारास जगदाळे (Santosh Jagdale) आणि गणबोटे यांचे मृतदेह पुणे विमानतळावर आणण्यात आले. यानंतर संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचे मृतदेह त्यांच्या घरी नेण्यात आले. यावेळी त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी पुण्यातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. (Kashmir Attack News)
संतोष जगदाळे हे त्यांच्या 86 वर्षांच्या वृ्द्ध आईला काश्मीरला जाण्यापूर्वी भेटले होते. काश्मीरला फिरायला जातोय, लवकर येईन, असे त्यांनी आईला सांगितले होते. मात्र, काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी त्यांना गोळ्या घालून ठार केल्याने जगदाळे कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. संतोष जगदाळे यांचा मृतदेह त्यांच्या घरी आणण्यात आला तेव्हा त्यांच्या पत्नीला अश्रू अनावर झाले. संतोष जगदाळे यांची पत्नी धाय मोकलून रडत होती.