सोलापूर: सोलापुरातील प्रसिद्ध न्युरो फिजिशीयन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे.
डॉ. वळसंगकर यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या मनीषा मुसळे-माने हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकर यांनी एक चिठ्ठी लिहलेली होती, यामध्ये मनीषा मुसळे-माने हिच्यामुळेच टोकाचे पाऊल उचलत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार रात्री 10 च्या सुमारास पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून रात्रीच न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.
कर्मचाऱ्याकडून धमकी मिळाल्याने तणावाखाली असल्याची चर्चा
डॉ. वळसंगकरांना रुग्णालयातील सर्व आर्थिक व्यवहार हे कागदोपत्रांवरती हवे होते. त्यासाठी त्यांचा आग्रह देखील होता, पण आजकाल रुग्णांकडून उपचाराची रक्कम कोणतीही नोंद न करता स्वीकारली जात होती. यासंदर्भात त्यांनी आक्षेप नोंदवला होता. पण त्यांचं कोणी ऐकत नव्हतं. जी महिला कर्मचारी अशी रक्कम स्वीकारत होती, तिला डॉ. वळसंगकरांनी कामावरून देखील काढलं होतं. पण नंतर या महिला कर्मचाऱ्याने कामावरून काढल्यानंतर आत्महत्या करण्याची धमकी डॉक्टरांना दिली होती. तिच्या धमकीवरून डॉक्टरांना पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, डॉक्टरांना ते मान्य नव्हते. या प्रकरणामुळे देखील डॉक्टर तणावाखाली गेल्याचे आणि त्यांनी असं टोकाचं पाऊल उचलल्याचीही चर्चा आहे.