धुळे : सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या तक्रारीवरून सोनगीरच्या सरपंच रंजना मोरे यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केलंय. एकाच पंचवार्षिक काळात सरपंच अपात्र होण्याची ही दुसरी वेळ आहे. भावजय सरपंच होती. तिच्या विरोधात नणंदेनं तक्रार केली होती. त्यावर ही कारवाई झाली आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये वॉर्ड क्रमांक 1 मधल्या पोटनिवडणुकीत रंजना मोरे सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. जानेवारी 2024 मध्ये त्या सरपंच म्हणून निवडून आल्या. नामनिर्देशन पत्र भरताना त्यांनी अतिक्रमण नसल्याची नोंद केली होती. पण प्रत्यक्षात त्यांच्या नावावर ग्रामपंचायतीच्या नोंदीनुसार बांधकाम असल्याची नोंद आहे. सदर घर हे अतिक्रमित जागेवर बांधल्याची तक्रार माजी सरपंच रुक्मिणी ठाकरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. गटविकास अधिकाऱ्यांच्या अहवालावरून रंजना मोरे यांच्या नावावरील मालमत्ता ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण असल्याचे दिसून येत असल्याचे नमूद झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी मोरे यांना ग्रामपंचायतीचे सदस्य व सरपंच म्हणून पदावर राहण्यास अपात्र घोषित केलंय.