Vaibhav Naik : बिडवलकरला संपवणाऱ्या सिद्धेश शिरसाटचा आका कोण? Sindhudurg
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती पोलिस स्टेशनला ९ एप्रिल २०२५ रोजी सिद्धिविनायक उर्फ प्रकाश उर्फ पक्या बिडवलकर याचं दोन वर्षांपूर्वी अपहरण करून हत्या केल्याप्रकरणीची बिडवलकर याच्या नातेवाईकांकडून तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर लागलीत निवती पोलिस आणि कुडाळ पोलिसांनी संशयित चार आरोपींना अटक केली. त्यानंतर त्यांना कुडाळ दिवाणी न्यायालयात हजर करून पोलिस कोठडी सुनावली. सध्या चौघे संशयित आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहेत. या प्रकरणात आता माजी आमदार वैभव नाईक यांनी उडी घेत सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. बीडपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्याची अवस्था भयानक असल्याचं म्हणत २२ हजारासाठी सिद्धीविनायक उर्फ पक्या बिडवलकर यांना नग्न करत अमानुष मारहाण करून खून करणाऱ्या सिद्धेश शिरसाट याचा आका कोण? असा सवालही माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित केला आहे. कुडाळ तालुक्यातील चेंदवन गावातील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर या युवकाला त्याच्या घरातून पैसे देत नसल्याच्या रागातून मार्च २०२३ ला अपहरण केले. अपहरण केल्यानंतर त्याला एका आरोपीच्या घरात डांबून बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये सिद्धिविनायक यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मयत सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर याला सातार्डा येथील जंगल भागातील स्मशानभूमीत जाळून त्याची राख आणि हाडे तेरेखोल नदीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रकार घडला. ते प्रकरणाचा आता दोन वर्षानंतर उलगडा लागला आहे. मात्र त्यात माजी आमदार वैभव नाईक यांनी उडी घेत सत्ताधारी आमदार आणि राजकीय बड्या नेत्यांचा २ वर्षे पोलिसांच्या तपासकामावर दबाव आल्याचा आरोप केला आहे.