Bachchu Kadu कर्जमाफीचा प्रश्न,बच्चू कडूंचा कृषीमंत्र्यांना फोन,माणिकराव कोकाटेंनी काय आश्वासन दिलं?
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि दिव्यांगांना मानधन वाढीचं आश्वासन भाजपकडून देण्यात आलं होतं. मात्र, अर्थसंकल्पीय अधिवेशनात यावर कुठलीही चर्चा करण्यात आली नाही किंवा दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यात आलं नाही. त्यामुळं झोपलेल्या राज्य सरकारला जागा करण्याकरिता प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं राज्यभरात बच्चू कडूंचा (Bachchu kadu) प्रहार संघटनेचा कार्यकर्ते (Protest) आक्रमक झालेय. कर्जमाफीच्या मागणीवरून राज्यभरात प्रहारच्या वतीने सत्ताधारी नेत्यांच्या घरासमोर मशाल मोर्चा काढण्यात येत आहे. तर स्वत: बच्चू कडू हे कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंच्या घरासमोर थेट मोर्चात सहभागी झाल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, भंडाऱ्यात सत्ताधारी शिवसेना पक्षाचे आमदार नरेंद्र भोंडेकर आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे यांच्या घरासमोर मशाल आंदोलन करण्यात आलं. यावेळी उपस्थित प्रहार संघटनेचे असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची मागणी केली. तर तिकडे साताऱ्यातील शिवतीर्थावर मध्यरात्री प्रहार संघटनेच्या वतीने मशाल आंदोलन करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेत हे आंदोलन थबवलंय.