मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 44 टक्के पगार येत्या मंगळवार पर्यंत देण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेऊन वित्त सचिवांशी केलेल्या चर्चेअंती एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन लवकरच अदा करण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचे फक्त 56 टक्के वेतन मिळाल्याचे वृत्त पसरल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. सांगोला तालुक्याच्या दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री शिंदे यांची काही एसटी कर्मचाऱ्यांनी भेट घेऊन आपले उर्वरित वेतन लवकरच देण्याची मागणी केली होती.
या मागणीची तत्काळ दखल घेऊन या प्रश्नावर शिंदे यांनी राज्याचे वित्त सचिव ओमप्रकाश गुप्ता यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या चर्चेअंती एसटी कर्मचाऱ्यांचे या महिन्याचे उर्वरित 44 टक्के वेतन येत्या मंगळवारपर्यंत अदा करण्यात येईल असे गुप्ता यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या पुढाकाराने एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असून त्यांच्यावरील वेतन कपातीचे संकट दूर होण्यास मदत झाली आहे.