Mumbai Chembur Firing : मुंबईतील चेंबूर परिसरात गोळीबार, व्यावसायिक सद्रुद्दीन खान जखमी
मुंबई : चेंबूरच्या आचार्य अत्रे उद्यानाजवळच्या सिग्नलजवळ एका बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार झाल्याची माहिती आहे. दोघा बाईकस्वारांनी त्याच्यावर गोळीबार केल्याची माहिती आहे. या बांधकाम व्यावसायिकावर रात्री 9.50 वाजता दोन गोळ्या झाडण्यात आल्या. त्यापैकी एक गोळी ही त्याच्या गालाला स्पर्श करुन गेली. तर दुसरी गोळी ही गाडीला लागल्याने काचा फुटल्या. सद्रुद्दीन खान (वय 50) असं या बांधकाम व्यावसायिकाचं नाव असून त्याला उपचारासाठी झेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. हा गोळीबार का आणि कुणी केला हे अद्याप स्पष्ट झालं नाही. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.
हा बांधकाम व्यावसायिक बेलापूरमध्ये राहणारा असून तो सायन-पनवेल हायवेवरून पनवेलच्या दिशेने जात असताना अचानक दोन बाईकस्वार आले आणि त्यांनी बांधकाम व्यावसायिकाच्या डिफेंडर गाडीवर गोळीबार केला. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये कुणालाही इजा झाली नाही.
संबंधित बांधकाम व्यावसायिक हा खासदार वर्षा गायकवाड यांचा निकटवर्तीय असल्याची माहिती सूंत्रानी दिली आहे. ज्या ठिकाणी गोळीबार झाला त्या ठिकाणी गोळ्यांचे काडतूस (पुंगळ्या) सापडल्या आहेत. त्या आधारे पोलिस अधिकचा तपास करत आहेत.