मुंबई : राज ठाकरे आणि मनसेविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. उत्तर भारतीयांविरोधात राज ठाकरे तिरस्कार पसरवत असून त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. उत्तर भारतीय विकाससेना नामक पक्षाच्या सुनील शुल्कांनी ही याचिका दाखल केली आहे. सुनील शुक्ला मुंबईचेच रहिवासी असून त्यांच्या पक्षाच्या कार्यालयावर गेल्या वर्षी मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप आहे.
उत्तर भारतीयांविरोधात राज ठाकरे हिंसेला पाठिंबा देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. राज ठाकरेंविरोधात तक्रार दाखल करून पक्षाची मान्यता रद्द करा. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात राज्य सरकारला तसे आदेस द्यावेत अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.
दरम्यान, मनसे कार्यकर्त्यांनी आपल्याला धमकी दिल्याची तक्रार सुनील शुक्ला यांनी पोलिसात केली आहे. मनसे कार्यकर्त्यांकडून फोन करून आणि सोशल मीडियावरून धमक्या दिल्याची तक्रार त्यांनी केली आहे.
मनसेचा भाजपवर आरोप
दरम्यान, शुक्लांच्या याचिकेनंतर मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी भाजपवर आरोप केले आहेत. प्रादेशिक पक्ष वाढू नयेत म्हणून हे भाजपचंच षडयंत्र आहे, असं देशपांडे म्हणाले. याआधी हा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेनं अनेकदा केला आहे. मात्र आता राज ठाकरेंची मनसे देखील असाच आरोप करू लागली आहे. मात्र संदीप देशपांडे यांनी केलेले हे आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फेटाळले आहेत.
संजय निरुपमांची मनसेवर टीका
शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "मनसे मराठी भाषेचा आग्रह ठेवतो यात गैर काही नाही. मनसे जी गुंडगिरी दाखवत आहे ते चुकीचं आहे. मनसेच्या गुंड कार्यकर्त्यांवर कारवाई झालीच पाहिजे. मनसेची आंदोलन करण्याची पद्धत चुकीची आहे. शहरात नवीन आलेल्यांना मारहाण करणं हे चुकीचं आहे. त्यामुळे मनसेने आता कोर्टाच्या निर्णयाला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी."
मराठी वि. हिंदी वाद
राज्यात, विशेषतः मुंबईत मराठी विरुद्ध हिंदी असा वाद वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मराठी न बोलता हिंदी बोलण्याची सक्ती काहींजणांकडून केली जात आहे. तसेच मराठी व्यक्तीला नोकऱ्यांमधून डावलण्यात येत आहे. त्याविरोधात मनसेने कडक भूमिका घेतली आहे. गुढीपाडव्याच्या मेळाव्याच्या भाषणामध्येही राज ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यावरून इशारा दिला होता.