पुणे: पुणे शहरातील नामांकित दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा जीव गेल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालय (Dinanath Mangeshkar Hospital) प्रशासनाने रुग्णाकडे उपचारांसाठी दहा लाखांची मागणी केली होती. महिलेला प्रसूतीच्या कळा सुरू झाल्यानंतर या महिलेस दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आणण्यात आले होते. हातात असलेले अडीच लाख भरायला तयार असतानाही महिलेला दाखल करून घ्यायलाही रुग्णालय प्रशासन तयार झाले नाही. शेवटी इतर रुग्णालयात हलवत असताना महिलेला त्रास झाला. अखेर जुळ्या मुलांना जन्म देऊन आईचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तनिषा सुशांत भिसे असे जीव गेलेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. पुण्यातील नामांकित रुग्णालयाला जीवापेक्षा पैसा महत्त्वाचा आहे का? असा सवालही उपस्थित केला जात आहे. त्यांना दहा लाख रूपये भरायला सांगितलेली ती रिसीट देखील आता समोर आली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गर्भवती महिलेच्या नातेवाईकाला 10 लाख डिपॉझिट भरण्यास सांगितल्याची रीसीट समोर आल्यानंतर अनेकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने तनिषा भिसे पैशांच्या हव्यासापोटी उपचारात अडवणूक केल्याने एका महिलेला जीव गमावावा लागला. पैशांअभावी हॉस्पिटलने गेटवरूनच गर्भवतीला परत पाठवल्याने आणि ऐन वेळी रुग्णवाहिका मिळू न शकल्याने महिलेचा नाहक बळी गेला. वेळीच उपचार मिळाले असते तर जन्मताच दोन नवजात बाळांनी आपली आई गमावली नसती, अशा शब्दांत दीनानाथ रुग्णालयाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. प्रसूती वेदना तीव्र होऊ लागल्याने महिलेला खासगी गाडीने 25 किलोमीटर अंतरावरील रुग्णालयात नेण्यात आले. तिथे तिनं जुळ्या मुलींना जन्म दिला, मात्र, वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने तिची तब्येत खालावली. तिला पुन्हा दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले. मात्र, त्या रुग्णालयात दाखल करताच गर्भवती महिलेचा मृत्यू झाला.