Sanjay Raut Full Speech : हिंदुत्वाच्या मुल्लांनी मला शिकवू नये.. 10 मिनिटांचं भाषण,संसदेत धुरळा
नवी दिल्ली : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यसभेत वक्फ विधेयकावर चर्चा सुरू असताना सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली. केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संजय राऊत म्हणाले, "तुम्ही (भाजप) खुश दिसत आहात, पण मुसलमानांची इतकी काळजी तर पाकिस्तानच्या मोहम्मद अली जिन्नांनाही नव्हती. जिन्नांचा आत्मा उठून तुमच्यात बसला आहे का?" त्यांच्या या टीकेमुळे सभागृहात गोंधळ उडाला.
तुम्ही स्वतःच हिंदुत्वाचे नवीन मुल्ला बनले
सत्ताधाऱ्यांनी हिंदुत्वाचा नारा दिला असला तरी आता तेच वक्फ बोर्डासंदर्भात मुसलमानांसाठी विशेष काळजी घेत आहेत, असा आरोप करत राऊत म्हणाले, "मला वाटायचं आम्ही हिंदुराष्ट्र बनवणार आहोत, पण आता गरीब मुसलमानांची काळजी घेण्याचा नवा अजेंडा सुरू आहे. एकेकाळी तुम्ही मंगळसूत्र, गाय-बैल मुसलमानांकडे जातील म्हणून आक्षेप घेत होतात, आता मात्र तुम्ही स्वतःच हिंदुत्वाचे नवीन मुल्ला बनले आहात."
अयोध्येतील जमीन घोटाळ्यावर निशाणा
अयोध्येत मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी-विक्री झाली, त्यावरही राऊत यांनी सवाल उपस्थित केला. "अयोध्येत जमीन घोटाळा झाला आहे. हिंदूंच्या जमिनीची रक्षा करता येत नसेल, तर मुसलमानांची काय करणार? तुमच्या सरकारला जमीन विक्रीच करायची आहे," असे म्हणत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.