Ajit Pawar Beed : बीडमध्ये हेलिकॉप्टरमधून उतरताच दादांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बीडच्या दौऱ्यावर आले आहेत. काहीवेळापूर्वीच अजित पवार हे हेलिकॉप्टरने पोलीस मुख्यालयाच्या परिसरात दाखल झाले. अजित पवार (Ajit Pawar) आज जिल्हा प्रशासकीय बैठकीसाठी बीडच्या (Beed News) दौऱ्यावर आले आहेत. दुपारी अडीच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीपूर्वी अधिकाऱ्यांनी सगळी माहिती तयार ठेवावी, अशी सूचना अजित पवार यांनी केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हेलिकॉप्टरमधून उतरताच पोलीस अधीक्षक, सीईओ आणि जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना सूचना केल्या आहेत. बीडमधील विमानतळ, रेल्वे लाईन, घरकुल याबाबतची सविस्तर माहिती देण्यास सांगितले आहे. दुपारपासून मिटिंग सुरु होतील. मी सुरुवात केल्यावर मग याची माहिती नाही, त्याची माहिती नाही, असं चालणार नाही. आता मला काय माहिती हवी आहे, ते तुम्हाला सांगितलं जाईल. विमानतळ, रेल्वे लाईन, राष्ट्रीय महामार्ग असे बरेच मुद्दे काढले आहेत. आता साडेआठ वाजले आहेत, पुढच्या चार तासांमध्ये मला सगळी अप टू डेट माहिती हवी आहे. डिसेंबरपर्यंत आपल्याला सगळं मार्गी लावायचं आहे. शेवटच्या क्षणाला सगळं चालणार नाही. डिसेंबरपर्यंत क्वालिटीची कामं होतात की नाही बघणार, असे अजित पवार यांनी अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर अजित पवार आपल्या पुढच्या दौऱ्याला निघून गेले. संध्याकाळी साडेपाच वाजता अजित पवार हे बीडमधील एका सार्वजनिक कार्यक्रमात पंकजा मुंडे यांच्यासह हजर राहणार आहेत. त्यापूर्वी बैठकांमध्ये काय घडते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.