¡Sorpréndeme!

Raj Thackeray Gudi Padwa 2025 : राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर गुढीपाडव्याचा उत्साह, सहकुटुंब उभारली गुढी

2025-03-30 1 Dailymotion

Raj Thackeray Gudi Padwa 2025 : राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा पार पडणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आज या पाडवा मेळाव्याच्या निमित्ताने मनसैनिकांशी संवाद साधणार आहेत. आगामी महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात  याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.

गुढीपाडवा नव्या शुभारंभाचा असं टीजरमध्ये सांगत हिंदुत्व, मराठी अस्मिता, सध्याच्या राजकीय पक्षांच्या भूमिका, नागपूर दंगल, महापुरुषांच्या अवमान प्रकरण, औरंगजेब कबर, मराठी आणि इतर भाषिक वाद अशा अनेक प्रश्नांवर राज ठाकरे बोलण्याची शक्यता आहे. सोबतच पक्षांतर्गत कार्यकारणी मध्ये केलेले बदल आणि पुढील राजकीय भूमिका नेमकी मनसे पक्षाची काय असणार यावर सुद्धा राज ठाकरे भाष्य करतील.

मनसेची पुढील राजकीय दिशा कोणती?

यंदाच्या मेळाव्याला विशेष राजकीय महत्त्व असून महापालिका निवडणुकीपासून ते सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे भूमिका स्पष्ट करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवर मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच मनसे सैनिकांची गर्दी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची पुढील राजकीय दिशा कोणती यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. 

संघटनात्मक गोष्टीचे रिझल्ट निवडणुकीत दिसले पाहिजेत- राज ठाकरे

काही दिवसांपूर्वी कामचुकार पदाधिकाऱ्यांची हकलपट्टी करणार असल्याचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिला होता. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पदाधिकारी आणि  कार्यकर्त्याच्या कामाचा लेखाजोखा तपासणार असल्याचेही त्यांनी सांगितलं होतं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक मोर्चेबांधणी करण्यासाठी संरचना करण्यात येत असल्याचेही राज ठाकरे म्हणाले होते. या संघटनात्मक गोष्टीचे रिझल्ट निवडणुकीत दिसले पाहिजेत असे त्यांनी पदाधिकाऱ्यांना मिळाव्यात सांगितले होते. आता मनसेची पुढची दिशा काय राहणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.