Devendra Fadnavis:भोंग्याला सरसकट परवानगी नाही, उल्लंघन केल्यास परवानगी कायमची रद्द :देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्यातल्या प्रार्थनास्थळावरच्या भोंग्यावर आता सरकारची करडी नजर असणार आहे. जो कुणी 55 डेसिबलच्या नियमांचं उल्लंघन करणार त्याची परवानगी कायमसाठी रद्द करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. प्रार्थनास्थळावरील भोंग्यांच्या आवाजाची तीव्रता तपासण्याचं काम हे पोलिस निरीक्षकाचं असून त्याची माहिती त्यांनी प्रदूषण नियंत्रण बोर्डला देणं गरजेचं आहे असं फडणवीस म्हणाले.
राज्यातील प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांच्या आवाजाबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यावर आज विधानसभेत प्रश्न विचारण्यात आला. उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कायद्यानुसार, अधिक डेसिबलने हे भोंगे वाजत असतील तर प्रदूषण नियमक मंडळ कारवाई करतं. कुणालाही सरसकट भोंग्याची परवानगी देणार नाही. निश्चित कालावधीसाठी परवानगी दिली जाईल. त्यानंतर जर पुन्हा कुणाला परवानगी हवी असेल तर ती पोलिसांकडून नव्याने घ्यावी लागेल.