Chhagan Bhujbal : कांद्यावरील (Onion) 20 टक्के निर्यातशुल्क रद्द करा, या मागणीसाठी लालसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी आक्रमक झाले. बाजार समितीतील कांदा लिलाव शेतकऱ्यांनी बंद पडले असून लालसगाव बाजार समितीतील पाण्याच्या टाकीवर चढून शेतकऱ्यांनी 'शोले स्टाईल' आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी संतप्त शेतकर्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याशी फोनवरून संवाद साधला. कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द व्हावे म्हणून विधानसभेत कांद्याचा प्रश्न तातडीने मांडणार, असे आश्वासन छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांना दिले. यानंतर विधानसभेचे कामकाज सुरु होताच छगन भुजबळ कांदा प्रश्नावरून चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
छगन भुजबळ म्हणाले की, कांद्याचा खर्च व नफा पकडून किमान 2250 रुपये मुल्य द्या. 3 हजार रुपये भागापर्यंत कु़ठलेही निर्बंध लावू नये. 3 ते 4 हजार रुपये किंवा 4 ते 5 हजार रुपये दर दिल्यावर कर लावा. अधिक दर झाल्यास निर्बंध लावा. त्यामुळे कायमस्वरूपी एक दर देण्यासाठी आपण विनंती करणार का? हे लोक कंपनी स्थापन करतात. नाफेड त्यांच्याकडून खरेदी करतात. दर कमी झाले की या कंपनी खरेदी करतात. नाफेडचे दर वर गेल्यावर याच कंपन्यांकडून कांदा खरेदी करते. यामुळे शेतकरी मरतो आणि कंपनी श्रीमंत होते. भारताचा 20 टक्के निर्यातकर, बांगलादेशचा दहा टक्के आयात कर आहे. मग कांदा उत्पादकांनी करायचं तरी काय? यावर राज्य सरकार केंद्र सरकारकडे जाऊन काही उपाय सुचवणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.