औरंगाबादमध्ये पावसाळ्यात घरात पाणी येत असल्यानं एका व्यक्तीनं त्याचं संपूर्ण घरच चार फूट वर उचललं. हाऊस लिफ्टिंग तंत्रज्ञानाचा वापर करून दोन हजार फुटांचा हा बंगला उचलण्यात आला. औरंगाबादच्या सातारा परिसरात आनंद कुलकर्णी यांनी हा वेगळा प्रयोग केलाय. या तंत्रज्ञानामध्ये घराच्या भिंतीच्या बाजूनं आधी दोन फूट खोदकाम केलं जातं. त्यानंतर बिम लागले की खाली जॅक लावून गाडी हवेत उचलावी तसं अख्खं घरच उचलण्यात येतं. पिलरच्या घरांना तसेच लोडबेअरिंगच्या घरांनाही या तंत्रज्ञानानं वर उचलता येतं. परदेशात या पद्धतीचा वापर बऱ्याच वर्षापासून होतोय. याआधी पुण्यातही असा प्रयोग करण्यात आला होता. आता औरंगाबादमध्येही हेच तंत्रज्ञान वापरून घर ४ फूट वर उचलण्यात आलंय.