साईबाबांनी सुमारे १११ वर्षांपूर्वी शिर्डीभोवती आखलेल्या सीमारेषवरून हजारो भाविकांनी रविवारी पहाटे परिक्रमा केली. साईबाबा संस्थानच्या वतीने गेल्या ३ वर्षांपासून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये आज संत-मंहत, आमदार-खासदार, पदाधिकारी यांच्यासह हजारो भाविक सहभागी झाले. खंडोबा मंदीर येथून सकाळी ६ वाजता यात्रेला सुरुवात झाली. साई परिक्रमा रथाचे पूजन सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज व काशिकानंदगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. साईनामाचा गजर आणि घोषणा देत साईभक्तांनी तब्बल १३ किलोमीटरची ही परिक्रमा पूर्ण केली. त्यासोबतच मार्गावर स्वच्छता मोहीमही राबवण्यात आली. करोनाचे सावट सरले असल्याने ही परिक्रमा उत्साहात पार पडली.