बुधवारी मनी लॉंड्रिंग प्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी ईडीने आठ तासाच्या चौकशीनंतर मंत्री नवाब मलिक यांना अटक केली. मंत्री नवाब मलिक यांना सत्र न्यायालयाने 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. ईडीने मलिकांवर कारवाई केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. तर, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या अटकेच्या कारवाईचा निषेध ठिकठिकाणी केला. गुरुवारी आघाडीतील नेत्यांनी मंत्रालयाशेजारील गांधी पुतळ्याजवळ निषेध आंदोलन केले. राज्यभरात तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत घोषणांसह जोरदार आंदोलन केले. नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ सोलापूर जिल्ह्यांत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र आले. राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कार्यलयासमोर केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. एक नवाब, सौ जवाब अशा आशयाची घोषणाबाजी करत कारवाईचा निषेध केला. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत. तर दुसरीकडे नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा यासाठी भाजपचे राज्यभरात आंदोलन सुरु आहे. भाजपने नाशिक, सोलापूर, औरंगाबाद, वाशिम जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या विरोधात आंदोलन केले. मंत्री नवाब मलिक यांचा तात्काळ राजीनामा घेण्याची मागणी यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी केली. गुरुवारी महाविकास आघाडी सरकार आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आंदोलन करताना दिसले. तर, उद्या म्हणजे शुक्रवापासून जिल्हा पातळीवर ही आंदोलन करण्यात येणार आहे.