भंडारा जिल्ह्यात एका वाघाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. छोट्या जंगली प्राण्यांची शिकार करण्यासाठी लावलेल्या विद्युत प्रवाहात हा वाघ अडकला. भंडारा शहरापासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या पलाडी गावाजवळ या वाघाचा मृत्यू झाला. शेतशिवारात शुक्रवारी दुपारच्या सुमारास वाघाचा मृतदेह गावकऱ्यांना दिसला. रावणवाडी, धारगाव या जंगलात फिरणारा B2 उर्फ रुद्र नावाने ओळखला जाणारा तरुण वाघ होता. जवळपास 5 वर्ष इतकं वय असलेला रुद्र अंदाजे 200 किलोचा रुबाबदार वाघ होता. ज्या ठिकाणी वाघाचा मृतदेह आढळला त्याठिकाणी तब्बल 1100 वॅटचा विद्युत प्रवाह जात आहे. वन विभागाच्या शोधमोहिमेनंतर वाघाची शिकार करणाऱ्या चौघांना अटक केली. तसेच शिकारीसाठी वापरलेली सर्व विद्युत उपकरणे वन विभागाने जप्त केली आहेत. रुद्रच्या अशा अकाली मृत्यूमुळे भंडारा जिल्ह्याचं आणि वन क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे.