उत्तर प्रदेशातील अत्तर व्यावसायिक असलेले पियुष जैन सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. पियुष जैन यांच्या घरावर टाकण्यात आलेल्या धाडीत तब्बल २५७ कोटी इतकी रोख रख्खम आणि २३ किलो इतकं सोनं सापडलं. त्यांची दुबईतही संपत्ती असल्याचं समोर आलं आहे. एका अत्तर व्यापाराकडे असलेली ही संपत्ती बघून सगळेच चक्रावले. पियुष जैन यांच्या घरात सापडलेल्या या घबाडातील पैसे मोजण्यासाठी खास मशीन मागविण्यात आल्या होत्या. तर ही संपत्ती नेण्यासाठी ट्रक बोलवावे लागले होते. तब्बल १२० तास कारवाईनंतर आता पियुष जैन १४ दिवसीय न्यायालयीन कोठडीत आहेत. हे सगळं ऐकून तुमच्या डोळ्यासमोर बॉलीवूड चित्रपटाची कथा उभी राहिली असेल तर तर त्यात काहीच वावगं नाही. कारण हे सगळं एखाद्या चित्रपटात घडावं असंच आहे. आणि लवकरच उत्तर प्रदेशातील ही घटना मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.