करोनामुळे गेले दीड वर्ष राज्यातील शाळांना कुलूप लागलं होतं. लॉकडाऊनमध्ये बंद असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शाळांमध्ये धुळीचं साम्राज्य तर पसरलं होतंच. शिवाय साप आणि विंचवांनी या शाळांना आपलं घर बनवलं होतं. करोनामुळे बंद असलेल्या राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून उघडण्याचे आदेश सरकारने दिले. परंतु अशा परिस्थितीत वर्ग कसे भरवायचे?, असा प्रश्न शिक्षकांपुढे होता. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी एक संकल्पना मांडली. या संकल्पनेतून 'स्वच्छ शाळा सुंदर शाळा' हा उपक्रम सोलापूर जिल्ह्यात राबविण्यात आला. या उपक्रमाला सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ५ कोटी रुपयांच्या लोकवर्गणीतून अडीच हजार शाळांचे सुशोभीकरण करून सीसीटीव्ही, संगणक पुरविण्यात आले आहेत.