यवतमाळ : जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. याबाबत लोकप्रतिनिधींनाही माहिती दिली. मात्र, याकडे कोणीही गांभीर्याने बघितले नाही. किसान कॉंग्रेसचे विदर्भ अध्यक्ष, शेतकरी नेते देवानंद पवार यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी कारेगाव व राजूरवाडी येथील शेतशिवार गाठून वस्तुस्थिती जाणून घेतली. त्यावेळी त्यांना 80 ते 90 टक्के महाबीजचे बियाणे उगवले नसल्याची बाब लक्षात आली. महाबीज या सरकारी कंपनीसह इतरही कंपन्यांचे सोयाबीन बियाणे उगवले नसल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी त्यांना सांगितले.