गुमगाव (जि. नागपूर) : दोन ते तीन दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे बळीराजाच्या तोंडचा घास पुन्हा हिरावला आहे. हातातोंडाशी आलेले हरभरा, गहू, भाजीपाला आणि तूर पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. एकीकडे हिवाळा संपून उन्हाळ्याचे वेध लागले असतानाच काही दिवसांपासून ऊन, सावली व अवकाळी पावसाचा खेळ सुरू आहे. त्यामुळे रब्बी व भाजीपाला पिकांना पुन्हा एकदा फटका बसण्याची शक्यता आहे. शेतात काढणीसाठी तयार असलेला गहू आणि हरभरा अवकाळी पावसामुळे ओला झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अवकाळी पावसानंतर शेतातील काढणी करून ठेवलेले पिक भिजल्यामुळे ताडपत्रीच्या साहाय्याने पीक झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सध्या सुरू आहे. खरीपाप्रमाणे रब्बीच्या पिकाचा घास पावसामुळे हिरावून जाऊ नये, याचीच दक्षता शेतात शेतकरी घेत असल्याचे चित्र आहे.
(व्हिडिओ : रविंद्र कुंभारे)